धोनीमुळे नव्हे तर मेहनतीच्या जोरावर संघात राहिलो; आत्मचरित्राच्या माध्यमातून रैनाची बॅटिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मैत्रीमुळे इतके दिवस खेळलो असं नाही. मी फक्त माझ्या मेहनत आणि कामगिरीच्या जोरावर संघात राहिलो, असे भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने म्हटले आहे. असे अनेक खुलासे आता ‘बिलिव्ह : व्हाट लाईफ अँड क्रिकेट टॉट मी ’ या आत्मचरित्रात वाचायला मिळतील.

श्री राममंदिर जमीन खरेदी वादात? ट्रस्टने आरोप फेटाळले

लखनऊ (वृत्तसंस्था) : अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी खरेदी करण्यात आलेली जमीन अवघ्या काही मिनिटांत दोन कोटींवरून १८.५ कोटींना खरेदी केल्याचा आरोप श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने फेटाळला आहे. मंदिरासाठी कमीत कमी दराने जमीन खरेदी केली आहे. काही राजकीय नेते लोकांची दिशाभूल करत आहेत, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे.

म्युकरमायकोसिसची सर्व औषधेजीएसटीमुक्त

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची ४४वी बैठक शनिवारी नवी दिल्लीत झाली. यात म्युकरमायकोसिसवरील सर्व औषधे करमुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अॅम्ब्युलन्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तथापि, कोरोना लसीवरील जीएसटी कायम राहणार या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना संबंधीच्या उपकरणांवरील जीएसटी देखील कमी करण्यात आला आहे. जीएसटीचे जारी करण्यात आलेले हे दर ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहतील.

नव्या चेंडूचा सन्मान कर; वीरेंदर सेहवागचा रोहित शर्माला सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडमध्ये खेळताना नव्या चेंडूचा सन्मान केला पाहिजे. तसेच चांगला फटका खेळण्यासाठी खराब चेंडूची वाट बघ, असा सल्ला माजी सलामीवीर वीरेंदर सेहवागने रोहित शर्माला दिला आहे. डावाच्या सुरुवातीस अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
प्रथम इंग्लंडमध्ये सलामी दिली, तेव्हा मी फार आक्रमक नव्हतो. स्विंगच्या अटींमुळेच १५०-१६० चेंडूत माझे शतक पूर्ण झाले. तिथे यशस्वी व्हायचे असल्यास तुम्हाला अटी व नवीन चेंडूचा आदर करावा लागेल.

दुसऱ्या लाटेत ७१९ डॉक्टरांचा मृत्यू

नवी िदल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. देशातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी दिवसरात्र मेहनत करून रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. पण या लढाईत अनेक डॉक्टरांना आपला जीव गमावावा लागत आहे. या दुसऱ्या लाटेत देशात आतापर्यंत ७१९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक बिहार आणि दिल्लीतील डॉक्टर असल्याची मािहती इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिली आहे.