विकास दुबेची माहिती देणा-यास अडीच लाखांचे बक्षीस

कानपूर (वृत्तसंस्था) : चकमकीत ८ पोलिसांची हत्या झाल्यानंतर संशयाच्या फे-यात अडकलेले चौबेपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख विनय तिवारी यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, गुंड विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांच्या २५ टीम तयार करण्यात आल्या आहेत. विकासबाबत माहिती देणा-यास आयजींनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

महाजॉब्स वेबपोर्टलचे अनावरण

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणा-या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे १७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत.

आपल्याच सरकारविरोधात शिवसैनिक आक्रमक; चड्डी-बनियन घालून देणार निवेदन

वसई (प्रतिनिधी) : एकीकडे कोरोनाचे संक्रमण त्यात सर्वत्र भीतीचे वातावरण तर दुसरीकडे आर्थिक चणचण अशा दुहेरी संकटात सर्वसामान्य नागरिक असताना महावितरण यांनी सरासरी भरमसाठ बिले पाठवून सर्वसामान्यांना झटका दिला आहे. त्याविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता वसई पश्चिम येथील वीज कार्यालयात नागरिकांतर्फे चक्क चड्डी- बनियान घालून एक लेखी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी दिली.

पांडवकडा धबधब्यावर ५९ पर्यटकांवर कारवाई

पनवेल (प्रतिनिधी) : बंदी झुगारून पांडवकडा धबधबा येथे जाणा-या तसेच लॉक डाऊन चे उल्लंघन करणा-या ५९ पर्यटकांवर खारघर पोलिसांची कारवाई केली. खारघर शहरातील पांडवकडा, फणसवाडी, ड्रायव्हिंग रेंज या प्रतिबंधित क्षेत्रात जाणा-या लोकांविरुद्ध खारघर पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी खारघर पोलिसांनी विनाकारण फिरणारे, मास्क न वापरणारे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणारे यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली असून एकूण ५९ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

माणुसकीचा अंत! रुग्णालयाबाहेरच अंधाचा तडफडून मृत्यू

नालासोपारा (प्रतिनिधी) : नालासोपा-यात रुग्णालयाबाहेर एका बेवारस व्यक्तीचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती भाजलेल्या अवस्थेत पाच दिवस रुग्णालयाबाहेर पडून होती. तसेच या रुग्णाबाबत येथील दुकानदारांनी रुग्णालयाला माहिती दिली होती. मात्र रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे अखेर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणारी या घटनेवरून रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.