Intellect Corrupt : बुद्धी भ्रष्ट झाली आहे का?

Primary tabs

उदयनराजे भोसलेंचा राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदींवर कडाडून प्रहार
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. कोश्यारी, त्रिवेदी यांच्या याच विधनानंतर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले आहेत. “भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी माफीनामा लिहून दिला, असे विधान केले. त्यांची बुद्धी भ्रष्ट (Intellect Corrupt) झालेली आहे की काय? जेव्हा मुघल साम्राज्यासमोर सगळे शरण जात होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज ताठ मानेने जनतेसाठी, देशासाठी उभे राहिले होते. त्यांना शरण जायचे असते तर तेव्हाच गेले असते. माफीनामा देण्याची गरज नव्हती. असे वक्तव्य करताना या लोकांना लाज वाटत नाही का? हे लोक कशाचा आधार घेऊन बोलत आहेत,” अशा शब्दांत उदयनराजे यांनी आपला संताप व्यक्त केला.
“आपण बारकाईने विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी तेव्हाच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विचाराची कल्पना मांडलेली आहे. त्यांनी तेव्हाच आधुनिक भारताची संकल्पना मांडली होती. राजकीय क्षेत्रातील नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतीसिंह नाना पाटील, भगतसिंह अशा अनेक राष्ट्रपुरुषांचे स्फूर्तीस्थान शिवाजी महाराज होते. सामाजिक क्षेत्रात क्रांती करणारे शाहु महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांना शिवाजी महाराजांच्या विचारांमुळेच प्रेरणा मिळालेली आहे. असे असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवाजी महाराजांचे विचार जुने झाले, असे विधान केले आहे. त्यांनी हे विधान कशाचा आधारवर केले आहे,” असे म्हणत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली.
“छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक जाती-धर्मातील व्यक्तीचा सन्मान केला. त्यांनी प्रत्येक धर्मातील धार्मिक स्थळांना आदराचे स्थान दिले. तरीदेखील असे वक्तव्य केले जात असेल तर चीड येते, राग येतो. आपल्या देशात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आपल्या देशात वेगवेगळ्या जाती-धर्मतील लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला होता. या विचारांच्या आधारवच देश अखंड राहू शकतो,” असेही उदयनराजे म्हणाले.The post Intellect Corrupt : बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? first appeared on .