Helmet : नाशिकमध्ये एक डिसेंबरपासून हेल्मेट बंधनकारक

Primary tabs

नाशिक : विनाहेल्मेट (Helmet) प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण शहरात वाढले आहे. अपघाती मृत्यू रोखता यावेत यासाठी प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान करूनच प्रवास करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी केले आहे. हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात एक डिसेंबरपासून मोहीम तीव्र करण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला आहे.
हेल्मेट (Helmet) न घातल्याने चालू वर्षात शहरात ८३ दुचाकीस्वारांनी जीव गमावला आहे. याशिवाय अन्य अपघातांमध्ये २६१ दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. अपघातात रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर जखमी होतात. रस्त्यावर डोके आपटून डोके फुटल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू होत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. शहरात प्रायोगिक तत्त्वावर पोलिसांनी मुंबई- आग्रा महामार्गावर गस्त वाढवली. त्यामुळे प्राणांतिक अपघातांमध्ये बऱ्यापैकी घट झाली. हेल्मेट वापरणे हे वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने अपघात झालाच तरी हेल्मेट वापरल्यामुळे जीवितहानीसह डोक्याला व चेहऱ्याला होणारी गंभीर दुखापत टाळता येते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर जाणीवपूर्वक करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी केले आहे.
हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालविणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायदा अधिनियम १९८८ चे कलम १२९/१७७ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येते. त्यामध्ये ५०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात येतो. एक डिसेंबरपासून हेल्मेट परिधान न करताच वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वीही हेल्मेट वापराबाबत शहरात वेळोवेळी मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. ज्या ज्या वेळी अशा मोहिमा राबविण्यात आल्या, त्या वेळी अपघातांच्या संख्येत आणि प्राणांतिक अपघातांमध्ये व गंभीर दुखापतींमध्येही घट झाल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनीही शहरात हेल्मेटसक्तीची मोहीम राबविली. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना हेल्मेटसक्ती करण्यात आल्याने या मोहिमेला सुरुवातीला विरोधही झाला. मात्र, या मोहिमेमुळे दुचाकीस्वार हेल्मेट परिधान करूनच घराबाहेर पडत असल्याचेही पाहायला मिळाले. आता नाईकनवरे यांनीही हेल्मेटचा वापराचा आग्रह धरला आहे. मात्र, हेल्मेटसक्ती केवळ चालकाला असणार की मागे बसणाऱ्याला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.The post Helmet : नाशिकमध्ये एक डिसेंबरपासून हेल्मेट बंधनकारक first appeared on .