शहरातील नागरिकांची सोय ! जन्म- मृत्यूचा दाखला आता महापालिकेतही मिळणार

Primary tabs

 सोलापूर : महापालिकेत शहरातील व ग्रामीण भागातील अनेकजण जन्म- मृत्यूच्या दाखल्यासाठी गर्दी करतात. कोरोना काळात या विषाणूचा संसर्ग वाढू नये, या हेतूने प्रशासनाने दाखले देण्याची सोय विभागीय कार्यालयात केली. मात्र, त्याठिकाणी गैरसोय होऊ लागल्याने नागरिकांसाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथील जन्म- मृत्यू विभाग (मुख्य कार्यालय) येथे एक खिडकी खुली करुन नागरिकांना दाखले दिले जाणार आहेत.
 

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून निर्णय 
नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांचे जन्म- मृत्यूचे दाखले त्यांच्याच परिसरातील विभागीय कार्यालयात मिळावेत म्हणून त्याठिकाणी दाखले देण्याची सोय करुन दिली. त्यांना दररोजचा कार्यवाही अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. आता नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेत एक खिडकी सुरु ठेवली जाईल. - धनराज पांडे, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका 

 
शहरातील आठ विभागीय कार्यालयांमध्ये त्या- त्या परिसरातील नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांचे जन्म- मृत्यूचे दाखले देण्याची सोय महापालिका प्रशासनाने उपलब्ध करुन दिली. मात्र, बहुतांश नागरिकांना झोन कार्यालयेच माहिती नाहीत. दुसरीकडे त्याठिकाणी अधिकारी, कर्मचारी नसल्याने त्यांना पुन्हा महापालिकेत हेलपाटे मारावे लागत आहेत. या पार्श्‍वभूमीवर उपायुक्‍त धनराज पांडे यांनी आता महापालिकेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र खिडकी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जन्म- मृत्यू दाखल्यासह अन्य प्रकारच्या अर्जांची विक्री करणाऱ्यांना प्रशासनाने बाहेर हाकलले आहे. ते खासगी लोक असून त्यांचा महापालिकेशी काहीही संबंध नसल्याने तसा निर्णय घेतल्याचे उपायुक्‍त पांडे यांनी स्पष्ट केले. आता ते सर्वजण हुतात्मा स्मृती मंदिरालगत अर्ज विक्री करीत आहेत. मात्र, जन्म- मृत्यूचे दाखले काढायला आलेल्या नागरिकांना अर्ज भरून देणे आवश्‍यक असल्याने त्यांची सोय पूर्वीच्याच ठिकाणी करावी, अशी मागणी केली जात आहे. त्यासंदर्भात आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याशी चर्चा करु, अशी ग्वाही महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली आहे. त्यावर आता प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.